Google search engine
Home Breaking News आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर

38

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर

आ. मुनगंटीवार यांनी शहराच्या विकासासाठी केली मित्र पक्षांची एकजूट

उबाठा आणि इतर पक्षाच्या पाठिंब्याने सौ.संगीता खांडेकर यांची महापौरपदी निवड तर उपमहापौरपदी प्रशांत दानव

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी चंद्रपूरच्या प्रगतीसाठी दिला विश्वास

चंद्रपूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांची महापौरपदी तर उपमहापौर प्रशांत दानव यांची निवड झाली. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने सोपविल्यानंतर ती पूर्ण ताकदीने पार पाडण्यात आली. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नवनियुक्त महापौरांचे व उपमहापौर यांचे अभिनंदन केले असून शहराच्या विकासाला नवी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा नेते चंद्रशेखरजी बावनकुळे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच मित्रपक्षाचे नेते संदीप गिऱ्हे, प्रशांत दानव आणि नंदू नागरकर यांच्या सहकार्याबद्दल देखील आ. मुनगंटीवार यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भाजपा, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची शिवसेना तसेच संदीप गिऱ्हे यांचा गट सर्वजण एकत्र आले आहे. शहराच्या विकासासाठी एकजुटीने काम करत चंद्रपूरच्या प्रगतीचा झंझावात निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.’

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी चंद्रपूर महानगरपालिकेला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास दिला असल्याचे सांगत आ. मुनगंटीवार यांनी आम्ही एकत्र आलो आहोत ते फक्त चंद्रपूरच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी, असे स्पष्ट केले. तसेच, चंद्रपूर महानगराचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करून हे शहर राज्यातील आदर्श शहरांपैकी एक बनवण्याचा आपला निर्धार असल्याचेही आ.सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले.