सियावर रामचंद्र की जय’ या दीपाक्षरांची विश्वविक्रमाला गवसणी !

67

*प्रभूरामाच्या चरणी सेवा अर्पण करून आयुष्य सार्थकी : ना. सुधीर मुनगंटीवार*

*३३ हजार २५८ पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र*

*‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ कडून प्रमाणपत्र प्रदान*

*‘सियावर रामचंद्र की जय’ च्या जयघोषाने दुमदुमली चंद्रपूर नगरी*

चंद्रपूर, दि.२१- मंगलवेशातील हजारो रामभक्त… रामभक्तीने ओतप्रोत वातावरण… एका क्षणाला हजारो पणत्या प्रज्वलित व्हायला सुरुवात झाली… आणि बघता बघता ‘सियावर रामचंद्र की जय’ ही दीपाक्षरे अवतरी. हे विहंगम दृष्य साकारले होते चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राऊंडवर. ३३ हजार २५८ पणत्यांनी साकारलेला रामनामाचा मंत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालणारा ठरला आणि अवघे चंद्रपूर ‘राममय’ झाले. याची दखल घेत आज (रविवार) गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मिलींद वेरलेकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना प्रमाणपत्र प्रदान केले तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर शहरातील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, देवराव भोंगळे, डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय अध्यक्ष राजेश्वर सुरावार, डॉ. तन्मय बीडवाई, पवन गादेवार, मिलिंद वेरलेकर, प्रसाद कुलकर्णी, पवन गादेवार, मधुसूदन रुंगठा, शैलेंद्र शुक्ला, अशोक संगिडवार, डॉ. गुलवाडे, प्रमोद कडू, राखी कंचर्लावार, रोडमल गहलोत, शैलेश बागला, मधुसूदन रूंगठा, चमकोरसिंह बसेरा, मीना देशकर, गिरिश मारलीवार, अन्नाजी ढवस, विनोद तिवारी, प्रभाकर खड़के, कुशन नागोसे, स्मिता रेवनकर, चंदाताई इटनकार, दामोदर सारडा, राजीव गोलीवार आदींची उपस्थिती होती.

दीपोत्सवाचे जगभरातील लाखो रामभक्त साक्षीदार ठरले. पहिली रामज्योत प्रज्वलित करण्याचा मान वाल्मिकी समाजाच्या शशी लखन, दुसरी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान केवट भोई समाजाच्या आशा दाते, तिसरी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान मुस्लिम समाजाच्या चांद पाशा सय्यद, चौथी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान अनुसूचित जातीच्या प्रियंका थुल, पाचवी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान आदिवासी समाजाच्या गीता गेडाम तर सहावी रामज्योत प्रज्वलित करण्याचा मान शीख समाजाच्या वतीने बलजीत कौर बसरा यांना मिळाला. तसेच सौ. सपना मुनगंटीवार, शलाका बिडवई यांनीही ज्योत पेटवली. त्यानंतर राम सेविकांमार्फत संपूर्ण ज्योती पेटविण्यात आल्या.

हा नयनरम्य सोहळा साजरा होत असताना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरकरांचे कौतुक केले. ‘अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरासाठी 29 मार्च 2023 रोजी चंद्रपूर-गडचिरोलीच्या दंडकारण्यातून अतिशय पवित्र भावनेने सागवान काष्ठ पाठविण्यात आले. त्या काष्ठापासून प्रभू राम मंदिराच्या गर्भगृहाच्या महाद्वाराचे अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामाच्या नावामध्ये चंद्रपूरचा चंद्र देखील आहे. प्रभू राम देशाच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे विश्वविक्रमी रामज्योत प्रज्वलित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही रामज्योत सेवेची व भक्तीची आहे,’ अशा उत्स्फूर्त भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

‘सियावर रामचंद्र की जय’ या ११ अक्षरी मंत्राच्या दीपप्रज्वलनाचे फोटो व व्हिडिओ गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या लंडन कार्यालयाला तसेच १८० देशांमध्ये पाठविले जाणार आहेत, अशी माहिती गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे श्री. मिलिंद वेरलेकर यांनी दिली.

*देशभरातून चंद्रपूरकरांचे अभिनंदन – ना. सुधीर मुनगंटीवार*

रामभक्तीचा विश्वविक्रम केल्यामुळे जगात चंद्रपूरचा गौरव वाढला आहे. आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत देशभरातील केंद्राचे प्रतिनिधी, महामंत्री, राज्याचे अध्यक्ष, प्रमुख, २१ खासदारांच्या बैठकीत सर्वांत पहिले एकमताने चंद्रपूरच्या अभिनंदनचा प्रस्ताव मांडण्यात आला, अशी माहिती ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

‘अयोध्येच्या वर्तमानपत्रात चंद्रपूरच्या सागवान काष्ठाचे कौतुक करण्यात आले आहे. मी कारसेवेला गेलो होते तेव्हाच्या सर्व घटना आजही आठवतात. त्यामुळे आज प्रभूरामाच्या चरणी सेवा अर्पण करून आयुष्य सार्थकी लागल्याचे समाधान आहे. आता पुढच्या टप्प्यात रामभक्तीचा विश्वविक्रम करणाऱ्या १३५० रामभक्तांना अयोध्येला नेण्याचा संकल्प केला आहे,’ असेही ते म्हणाले.

*भवानी मातेची पालखी अन् श्रीशैलमचे मंदिर*

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक होण्यापूर्वी प्रतापगडच्या भवानी मातेच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. तिथे त्यांनी एक रत्नजडीत छत्र भवानी मातेला चढवले. नंतर त्याची लूट झाली. पण पुन्हा चांदीचे छत्र बसविण्याचे भाग्य आपल्याला लाभले. महाराजांच्या राज्याभिषेकाची शोभायात्रा निघते तेव्हा पालखीही निघते. ही पालखी सुद्धा जीर्ण झाली होती. ती आपण चंद्रपूरच्या वतीने साठ किलो चांदीची पालखी दिली. पुढील दोनशे वर्षे राज्याभिषेकाची शोभायात्रा त्याच पालखीतूनच निघणार आहे याचा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या श्रीशैलममध्ये तपश्चर्या केली, तिथे महाराजांचे एक छोटे मंदिर होते. सरकारने तिथे भव्यदिव्य मंदिर उभे केले. २९ जुलै १९५३ नंतर पहिल्यांदा अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण सरकारने हटवले. महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे सरकार ब्रिटनवरून भारतात येणार आहेत. जम्मू-काश्मीर मधील कुपवाडा येथे ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाकिस्तानच्या दिशेने तलवार पकडलेल्‍या पुतळ्याचे देखील काही दिवसांपूर्वी अनावरण झाले. आता शत्रूची वाकडी नजर भारतावर पडणार नाही, याचाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.