*चंद्रपूरचे मेडीकल कॉलेज देशातील सर्वोत्‍तम ठरावे यासाठी प्रयत्‍नांची शर्थ करणार – आ. सुधीर मुनगंटीवार*

102

*रूग्‍णसेवेतुन मिळणारे आत्‍मीक समाधान कोणत्‍याही पुरस्‍कारापेक्षा मोठे.*

*आ. मुनगंटीवार यांच्‍या विचारांनी व कार्याने प्रभावित – डॉ. आशुतोष पांडे*

*श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूर द्वारा निःशुल्‍क हृदयरोग तपासणी शिबीर संपन्‍न.*

*० ते १८ वयोगटातील रूग्‍णांची हृदयरोग तपासणी.*

‘देव बोलतो बालमुखातुन, देव डोलतो उंच पिकातुन’ या ओळीनुसार बालकांच्‍या आरोग्‍याला श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन आयोजित या शिबीराचा निश्‍चीतपणे फायदा होईल. माझ्या दिवंगत वडिलांनी ५९ वर्षे वैद्यकिय व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातुन रूग्‍णसेवा केली. माझ्या कुटूंबात मी वगळता सर्वच डॉक्‍टर्स आहेत. मी जरी डॉक्‍टर नसलो तरीही लोकप्रतिनिधी म्‍हणून रूग्‍णसेवेसाठी एम्‍सपेक्षाही उत्‍तम असे देशातील सर्वोत्‍तम रूग्‍णालय म्‍हणून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूरची निर्मीती मी करीत आहे हे रूग्‍णालय रूग्‍णसेवेचे प्रशस्‍त दालन ठरेल, असा विश्‍वास माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला.

दिनांक १८ जून २०२२ रोजी श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूर द्वारा आयोजित स्‍व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ फोर्टीज हॉस्‍पीटल मुंबई यांच्‍या विशेष सहकार्याने आयोजित बालकांच्‍या निःशुल्‍क हृदयरोग तपासणी शिबीराच्‍या उदघाटन सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, मी ज्‍येष्‍ठ उद्योजक रतन टाटा यांच्‍याशी झालेल्‍या भेटीदरम्‍यान त्‍यांना चंद्रपूरात कॅन्‍सर हॉस्‍पीटल टाटा ट्रस्‍टच्‍या माध्‍यमातुन स्‍थापन करावे अशी विनंती केली आणि त्‍यांनी देशात टाटा ट्रस्‍टच्‍या माध्‍यमातुन फक्‍त दोन कॅन्‍सर हॉस्‍पीटल उपलब्‍ध करण्‍याचे जाहीर केले. त्‍यातील एक पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्‍या वाराणसी मतदार संघात तर दुसरे माझ्या चंद्रपूरात. ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे, असेही ते म्‍हणाले.

रूग्‍णसेवेचा फायदा आत्‍मीक समाधानासाठी कसा होतो याचे उदाहरण सांगत आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, मी एकदा गडचिरोली दौ-यावर गेलो असता पुलाच्‍या आधी एक मुलगा खरबुज आणि शेंगदाणा फल्‍ली विकत होता. मी गाडी थांबवून त्‍याच्‍याकडे खरबुज आणि शेंगदाणा फल्‍ली विकत घेण्‍यासाठी गेलो. त्‍या मुलाने आपल्‍या आईवडीलांना बोलावले. मी वस्‍तु विकत घेतल्‍यानंतर त्‍याला पैसे दिले, मात्र त्‍याने नकार दिला. ब-याच आग्रहानंतरही तो पैसे घेण्‍यास नाही म्‍हणाला. मी त्‍याच्‍या आईला विचारले असता त्‍या म्‍हणाल्‍या की पांच वर्षाच्‍या आधी हा गंभीर आजारी असताना आपल्‍या कार्यालयाच्‍या माध्‍यमातुन सावंगी मेघे येथील रूग्‍णालयात त्‍याच्‍यावर उपचार झाले व आज तो पूर्णपणे बरा आहे. या कृतज्ञतेपोटीच तो पैसे घ्‍यायला नकार देत आहे. असे जेव्‍हा त्‍याच्‍या आईने सांगीतले तेव्‍हा रूग्‍णसेवेच्‍या माध्‍यमातुन आपण जे कार्य करतो त्‍याचे आत्‍मीक समाधान मला लाभले, हे समाधान कोणत्‍याही पुरस्‍कारापेक्षा मोठे आहे, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले. फोर्टीज रूग्‍णालयाशी माझा कधिही संबंध आला नाही. मात्र या शिबीराच्‍या माध्‍यमातुन त्‍यांनी वेळ दिला, सहकार्य केले ते मी कधिही विसरू शकणार नाही. या शिबीराच्‍या पुढील टप्‍प्‍यातही रूग्‍ण व त्‍यांच्‍या नातेवाईकांची कोणतीही गैरसोय होणार नाही अशी ग्‍वाही आ. मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना दिली. माझ्या वडिलांचे निधन झाल्‍यानंतरही या ईश्‍वरीय कार्याला थांबवू नये म्‍हणून आम्‍ही हे शिबीर पुढे नेत आहोत, असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले.

यावेळी बोलताना फोर्टीज रूग्‍णालयाचे डॉक्‍टर आशुतोष पांडे म्‍हणाले, मुंबईत एका कार्यक्रमात मी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे भाषण ऐकले. समाजात डॉक्‍टर्स, सैनिक यांच्‍या योगदानाबद्दल ते भरभरून बोलले. मानव जीवन आपल्‍याला मिळाले त्‍या माध्‍यमातुन दुस-याची सेवा करावी हे आपले आद्यकर्तव्‍य आहे असेही ते म्‍हणाले होते. एका नेत्‍याचा हा मनोदय ऐकुन मी प्रभावित झालो. अॅनेस्थेसिया चा शोध लावणा-या तज्ञाने पहिले स्‍वतःवर प्रयोग केला, त्‍यासाठी त्‍याने स्‍वतःचा जीव धोक्‍यात घातला व नंतर समाजाला त्‍याचा लाभ दिला हे एक डॉक्‍टरच करू शकतो असे उदाहरण आ. मुनगंटीवार यांनी त्‍यावेळी दिले होते. त्‍यांच्‍या कार्याविषयी मी बरेच ऐकले होते, मात्र या भेटीदरम्‍यान त्‍यांचे विचार ऐकुन मी त्‍यांच्‍याशी जोडला गेलो. त्‍यांच्‍या कार्याला माझे अभिवादन असल्‍याचे डॉ. आशुतोष पांडे यावेळी बोलताना म्‍हणाले.

यावेळी डॉ. भरत सोनी, डॉ. स्‍वाती गारेकर, डॉ. विजय सावंत, डॉ. विद्या शेट्टी, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. श्‍वेता आईंचवार, राहूल पावडे, राजेश सुरावार, शैलेंद्रसिंह बैस, सागर खडसे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. या निःशुल्‍क हृदयरोग तपासणी शिबीरात ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करण्‍यात आली. यात जे बाल रूग्‍ण शस्‍त्रक्रियेसाठी पात्र ठरतील त्‍यांच्‍यावर शस्‍त्रक्रिया करण्‍यात येतील. या कार्यक्रमाला बाल रूग्‍णांसह त्‍यांच्‍या पालकांची व गणमान्‍य नागरिकांची उपस्थिती होती.