*अजयपूर नजिक झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ५ लाखाच्या आर्थीक मदतीच्या धनादेशाचे वितरण*
*मृतकांच्या कुटुंबियांच्या खंबीरपणे पाठीशी : सुधीर मुनगंटीवार*
चंद्रपूर-मुल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या डिझेल टॅंकर व लाकडाने भरलेला ट्रक यांच्यात झालेल्या भिषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ५ लाख रूपये अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन देण्याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. आ. मुनगंटीवार यांच्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री निधीतुन मृतकांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ५ लाख रूपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली. या घटनेतील मृतकांच्या कुटुंबियांना दि. 18 जून रोजी धनादेशाचे वितरण माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
अजयपूर गावाजवळ दि. 19 मे रोजी झालेल्या भिषण अपघातादरम्यान मोठी आग लावून ९ मजूरांचा भाजून मृत्यु झाला होता. या अपघातानंतर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मुख्यमंत्री निधीतुन मृतकांच्या कुटूंबियांना ५ लाख रूपये अर्थसहाय्य देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांच्याशी याबाबत त्यांनी चर्चा देखील केली होती. जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने यांची भेट घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याची विनंती केली होती. जिल्हाधिका-यांनी आ. मुनगंटीवार यांच्या पत्राच्या संदर्भाने शासनाला प्रस्ताव सादर केला.मृतकांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन प्रत्येकी ५ लाख रूपये अर्थसहाय्य देण्याबाबतचा आदेश दि. 25 मे 2022 रोजी जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना निर्गमित करण्यात आला.
बल्लारपुर तालुक्यातील लावारी येथे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थीतीत मृतकांच्या कुटुंबियांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या अर्थमंत्री पदाच्या काळात विधवा, निराधार महिलांच्या मानधनात ६०० रूपयांवरून १२०० रूपये वाढ केली याची आठवण करून दिली व मा. तहसिलदारांना यातील पात्र महिलांना या योजनेचा ताबडतोब लाभ देण्याचे निर्देश दिले. जे तहसिलदारांनी मान्य केले. मा. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सुरू केलेल्या योजनेत विधवा, निराधार महिलांना एकमुश्त २० हजार रूपये सुध्दा याप्रसंगी आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याच बरोबर यासर्व महिलांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी तहसिलदारांना दिले. याप्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, या दुर्दैवी घटनेत कुटुंबानी आपला आधार गमावला आहे. हे नुकसान मोठे आहे. केवळ अश्रु पुसून ते भरून निघणार नाही. या कुटुंबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत अशी ग्वाही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, लखनसिंह चंदेल, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार, माजी जि.प. सदस्या सौ. वैशाली बुध्दलवार, बल्लारपूरचे तहसिलदार श्री. संजय राईंचवार, काशी सिंह, सतविंदर सिंग दारी, रमेश पिपरे, गोविंदा पोडे, राजु बुध्दलवार, लावारीचे सरपंच योगेश पोतराजे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.