मुल तालुक्यातील पुनर्वसित भगवानपुर येथे विशेष शिबिर यशस्वीरित्या संपन्न

57

दिनांक 28 ऑक्टोबर रोज शनिवार ला मुल तालुक्यातील भगवानपुर येथे तहसिल कार्यालय मुल, तहसील कार्यालय चंद्रपूर, तहसील कार्यालय भद्रावती, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर व पंचायत समिती मुल यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
बोटेझरी(ता.भद्रावती) व कोळसा(ता.चंद्रपूर) येथून भगवानपुर येथे सन 2007 व 2012 मध्ये पुनर्वसन झाले आहे. त्यामुळे सन 1950 पूर्वीचे रहिवास पुरावे बोटेझरी व कोळसा येथील असल्याने जात प्रमाणपत्र काढण्याकरिता तहसील कार्यालय भद्रावती व तहसील कार्यालय चंद्रपूर येथे जावे लागत असे. ते ध्यानात घेऊन जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, राशन कार्ड, संजय गांधी योजना, नवीन मतदार नोंदणी, घरकुल योजना इ सेवा एकाच ठिकाणी वितरित करण्यात यावे याकरिता शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तथा उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर मा. श्री मुरुग्नंथम, भा प्र से यांनी भगवानपुर ग्रामवसियांना शासनाकडून आदिवासी समुदायाकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याकरिता विविध दाखल्यांकरिता अर्ज करण्यास आवाहन केले. तसेच आदिवासी समुदायातील अल्प वयामध्ये होणाऱ्या विवाहपद्धतीमुळे आरोग्यावरील होणारे दुष्परिणाम व शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष याकडे लक्ष वेधून आरोग्य व शिक्षणाचे महत्व पटवून दिले. प्रमुख अतिथी मा. श्री विशाल मेश्राम, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी मुल यांनी संबोधित करताना 18 वर्षांवरील मतदार नोंदणी न झालेल्या सर्वांना मतदार नोंदणी करून घेण्याबाबत व शासन आपल्या दारी आले असून या संधीचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले. या वेळी डॉ रवींद्र होळी तहसीलदार मुल, श्री अनिकेत सोनावणे तहसीलदार भद्रावती, डॉ सचिन खंडाळे नायब तहसीलदार, चंद्रपूर, श्री बी एच राठोड गट विकास अधिकारी मुल, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री पोळ, श्री सचिन गरमडे सरपंच भगवानपुर व श्री विकास येरमे उपसरपंच भगवानपुर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

या शिबिरामध्ये उत्पन्न प्रमाणपत्राचे 45, अधिवास प्रमाणपत्राचे 9, जात प्रमाणपत्राचे 164, अन्नपुरवठा 28, सांगायो 33, निवडणूक 37, तलाठी अहवाल 40 व शबरी घरकुल योजनेचे 23 असे एकूण 381 अर्ज एकाच दिवशी सादर भगवानपुर ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यापैकी काही लाभार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका जे मिळण्याकरिता साधारणतः 20 ते 30 दिवसांचा कालावधी लागतो ते त्वरित शिबिरामध्ये एकाच दिवशी एकाच ठिकाणी वाटप वाटप करण्यात आले. ज्या लाभार्थींकडे सन 1950पूर्वीचे पुरावे नाहीत अशा लाभार्थ्यांचे गृह चौकशी अहवाल तयार करून अर्ज भरून घेण्यात आले. त्यामुळे पुरव्या अभावी कोणताही आदिवासी लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी घेण्यात आली. यामुळे आदिवासीबहुल भगवानपुर येथील शबरी आवास योजनेचे लाभार्थ्यांना तसेच इतर योजना व विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सेवा मिळाली याबद्दल समस्त ग्रामवासियांनी समाधान व्यक्त केले व प्रशासनाचे आभार मानले. या वेळी तहसील कार्यालय मुल, चंद्रपूर, भद्रावती, प स मुल व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर चे संपूर्ण स्टाफ, सर्व मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, सेतू टीम व समस्त गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नायब तहसीलदार नंदकिशोर कुंभरे व आभार प्रदर्शन सचिन गरमडे सरपंच भगवानपुर यांनी केले.