*पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही*
*भविष्यात नर्सिंग, डेंटल आणि पॅरामेडीकल कॉलेज आणण्याचे नियोजन*
*चंद्रपूर: वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टर अभ्यासक्रमासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णसेवाही देत असतात. अशावेळी या डॉक्टरांना चांगली वागणूक मिळावी आणि त्यांच्या हातून चांगली सेवा घडावी, याची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे येथील निवासी डॉक्टरांच्या मुलभूत समस्या त्वरित सोडविण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सर्वोत्कृष्ट करण्यासाठी भविष्यात चंद्रपुरात नर्सिंग, डेंटल आणि पॅरामेडीकल कॉलेज आणणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.*
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या समस्यांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रणय गांधी, निवासी डॉक्टर संघटनेचे (मार्ड) डॉ. अक्षय वाघमारे, डॉ. पल्लवी रेड्डी, डॉ. प्रशांत मकदूम आदी उपस्थित होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयात लवकरच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडून सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी आपण व्यक्तिश: लक्ष देऊ, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, 175 सुरक्षा रक्षकांचे 1 कोटी 44 लक्ष 51 हजार 439 रुपये 30 मे 2024 रोजी महाराष्ट्र सुरक्षा मंडळाला देण्यात आले आहे. उर्वरीत रक्कम सुरक्षा मंडळाला त्वरीत देण्यात येईल. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीकरीता 450 सुरक्षा रक्षकांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकांचा निधी राज्य शासनाने थेट महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे देण्याबाबतचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आपण मांडणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालयात एका रुग्णासोबत एक नातेवाईक असा नियम आहे. याबाबत रुग्णालयाकडून पास सुध्दा वितरीत करण्यात येते मात्र ब-याचवेळी नातेवाईक रुग्णालयात गर्दी करतात. नातेवाईकांमध्ये एखादा व्यक्ती जर दारु पिऊन असेल तर त्याची माहिती त्वरीत पोलिसांना द्यावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्यासाठी 33 कोटी 65 लक्ष रुपयांचा फर्निचरचा प्रस्ताव आणि 42 कोटी 79 लक्ष रुपयांचा अत्याधुनिक साधनसामुग्रीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नवीन इमारतीमध्ये चांगल्या कंपनीचे फर्निचर लावा.
*‘निधीची वाट बघणार नाही’*
विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. सामान्य रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, त्यांची स्वच्छता व शुध्दीकरण व इतर मुलभूत सुविधांसाठी शासनाच्या निधीची वाट न पाहता जिल्हा नियोजन समिती आणि खनिज विकास निधीतून पैसे उपलब्ध करून दिले जातील, असा विश्वास देत येथील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. महिला रुग्णालय त्वरीत सुरू करण्याचे तसेच नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्गावरील अतिक्रमण काढण्याचे निर्देशही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.