#दिवंगत_बाळू_धानोरकर_यांच्या_निमित्याने….!!

25

 

*( गोमती पाचभाई यांचा विचारणीय लेख ❗)*

*आमदारीन बाईंना वाटत मी हा लेख पैसे घेऊन लिहिला आहे…. पैसे देऊन कोणत्या बातम्या दाबल्या हेही त्यांनी जाहीर करावे…. अथवा मी करेन…. म्हणून हा लेख आधी संक्षिप्त टाकला होता वं फेसबुक ला जाउन वाचा असं म्हटलं होत… परंतु आता हा वाचकांनी संपूर्ण वाचवा म्हणून मुद्दाम शेअर करतेय…. गोमती पाचभाई*

?व्यक्तिपूजा : समाजाचा दोष…!!

मृत्यू हे त्रिकालाबाधित सत्य आहे. एखादा व्यक्ती मरण पावला की त्याला देवत्व द्यायची आपली परंपरा आहे व मेलेल्या व्यक्ती बद्दल वाईट बोलू नये, ही आपली संस्कृती आहे. मात्र चुकीच्या प्रवृत्तीचे उदात्तीकरण करणे ही बौध्दिक दिवाळखोरी व मानसिक गुलामी आहे. आपल्याला सोयीचे आहे म्हणून ‘चुक’ला ‘बरोबर’ म्हणणे, हा सध्याच्या युगातला पायंडा आहे. पण हाच पायंडा समाजाचा व देशाचा घात करीत आहे, हे प्रकर्षाने सांगायचे आहे.

एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे यश हे त्याने जीवनात स्वत:च्या उत्थानासाठी केलेल्या कामगिरीवर तोलू नये तर त्याने जाताना आपल्या पाठीमागे समाजाला उपयोगी पडेल असे काय स्थायी स्वरूपात करून ठेवले, त्यावर मोजावे. स्वतःच्या उन्नती साठी व यशाच्या शिखरावर जाण्यासाठी तुम्ही अंगिकारलेल्या मार्गाचे एकदा समर्थन होईलही मात्र त्या शिखरावर पोहोचल्यानंतर जर तुम्ही ज्या मार्गाने गेले तो मार्ग सुंदर करत नसाल, त्या मार्गात तुम्हाला सहकार्य करणाऱ्या व तुमच्या यशात योगदान दिलेल्यांचा विसर तुम्हाला पडत असेल तर तुमच्या स्वार्थीपणाचे समर्थन कदापि होणार नाही.

*आपल्या देशात विषय हे चुकीच्या पध्दतीने हाताळण्याची प्रथा आहे.*
*We should always discuss the matters, and not the men.*
*परंतु असे होत नाही, आपण नेहमी माणसांची चर्चा करतो आणि मूळ विषय तसेच राहतात. म्हणजे आपल्या बेसिक समस्या निकाली न निघण्यास आपण स्वतःच जवाबदार आहोत.*

*निवडणुकांची वाट बघणे, प्रचार करणे, एखाद्याचे अकारण उदात्तीकरण करणे, त्याला जिंकविने, त्याच्या जिंकण्याच्या चर्चा करणे, त्याला ‘Larger than Life’ भासविने व परत निवडणुकांची वाट बघणे, हेच चक्र सुरू राहते. मात्र दोन निवडणुकीच्या दरम्यान जनसेवेची कामे करण्याचा एक स्पैन असतो. त्या स्पैन मधे जनता कमालीची गप्प असते. बेसिक प्रश्नांवर चर्चा करणे व जवाबदार व्यक्तीस जाब विचारणे हे आपल्याला सुचतच नाही किंवा आपल्यात ती चर्चा करण्याची व प्रश्न विचारायची हिम्मत नाही. निवडणुका जिंकणे हा विषय नसायला हवा तर जिंकल्यावर काम करणे हा विषय असायला हवा.*

*तुम्ही शाळा, महाविद्यालये, क्रीडा अकादमी, दवाखाने, वृध्दाश्रम, कारखाने, जलाशये, पर्यावरण संवर्धन आदी लोकोपयोगी संस्थाने, जी येणाऱ्या पिढी साठी उपयोगी ठरेल, ती निर्माण करून जात असाल तर तुम्ही तुमचा ब्रँड बनविला असे होईल पण तुम्ही निव्वळ निवडणुका जिंकून, बंगले बांधून, मद्य दुकानांची निर्मिती करून, कोळसा चोरी करून, अवैध व्यवसायांना उत आणून तुमचे यश सांगत असाल तर ते यश नव्हे व यास कुणी यश म्हणत असेल तर त्याच्या बौद्धिक दिवाळखोरीची कीव केलेलीच बरी…*

*भारत हा गुलामांचा देश आहे, असे कुणी तरी म्हटले होते. जिवंत असताना त्याच्या भीतीपोटी त्याने केलेल्या चुकीच्या कामांचे उदात्तीकरण करणे, ही गुलामी होय. व तो मेल्यानंतरही त्याचे उदात्तीकरण सुरूच ठेवणे, म्हणजे आंधळे भक्त बनणे होय. मग यातूनच सुरू होतो खेळ… त्याच्या घराणेशाही, हुकुमशाही, व्यक्तिपूजा व देवत्वतेचा…!* *समाजात नेतृत्वच नाही, असे समजून त्याच घराण्यातील इतर सदस्यांकडे नेतृत्व म्हणून बघणे, हेही भक्तपणा सिध्द करण्यासारखे आहे. इथे प्रत्येकाला क्षमता दाखविण्याची समान संधी मिळालीच पाहिजे. नेतृत्व बदलत असले पाहिजे, म्हणजे नेतृत्वाचा कस लागतो व तो हुकुमशहा बनण्याची शक्यता राहत नाही.*

*समाजात अनेक चांगले, नेतृत्वगुण असलेले, वैचारिक, बौध्दिक, कार्यकुशल लोक आहेत. त्यांना समाजाने हेरले पाहिजे, परंतु पैसेवाल्यांच्याच मागे जाणारा आपला समाज आहे, ही शोकांतिका आहे.* *आपल्याला वाघ नको आहे. तो जंगलात कुणाचेच रक्षण करीत नाही. उलट वाघ नरभक्षी असतो. त्याला रक्ताचे घोट हवे असतात. त्यापेक्षा आपल्याला एखादा कुणीही सामान्य चालेल जो स्वयंप्रकाशित होवून, स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाशमान करेल.*

*काल परवा मी अशाच एका दाम्पत्याची मुलाखत यू-ट्यूब वर बघत होतो. त्या मुलाखतीत व्यक्तित्व (वयक्तिक) विषयांचीच चर्चा जास्त होती. त्या मुलाखतीत केलेल्या व न केलेल्या कामांची चर्चा असती, जनतेच्या प्रश्नांचे उत्तरदायित्व असते, तर मुलाखत आणखी सुंदर झाली असती. इथेच आपण चुकतो. प्रतिमा पूजेस आपण जास्त महत्व देतो.* *त्यापेक्षा विचार पूजा केली तर बदल नक्की घडेल, हे ध्यानात घेत नाही.*

*तुमच्यातल्या अनन्य साधारण क्षमतेची, कमी वयात साध्य केलेल्या कामगिरीची दखल नक्कीच इतिहास घेईल. तुम्ही इतिहास निर्माण केला, यात शंका नाही. मात्र तो कुणाच्या फायद्याचा, हा संशोधनाचा विषय राहील. तुम्ही तुमच्या काळात समाजात नेतृत्व घडू दिले नाही. कुणी विरोधात गेले की त्याला गुंडांच्या हाताने मारायला लावायचे, यातून तुम्ही दहशत निर्माण केली. सर्व महत्त्वाची पदे घरातच ठेवली.* *इतरांना गृहीत धरले. तुम्ही स्वतः सोबत दुसरे नेतृत्व घडवित गेले असते, तर आज समाजाला नेतृत्व शोधायची कदाचित गरज पडली नसती.*

*जिल्ह्यात तुम्ही कोणताच छोटा-मोठा उद्योग आणला नाही, रोजगार निर्मिती होईल असे काही केले नाही. उलट बेरोजगारीच्या काळात जिल्हा बँकेत येथील स्थानिकांना रोजगार मिळेल याचा विचार न करता तुम्ही नोकर भरती वर स्थगिती आणत गेले. यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हा बँकेत तुम्ही किती डोनेशन आकारून नोकर भरत्या केल्या, हे कुणाला माहीत नाही, असेही नाही. त्यामुळेच मनी लॉड्रिंग व इडी प्रकरणे तुमच्या घरात आली.*

*पद बदलले पण पदाचे पीए तेच राहत होते. गेले २० वर्षे लोकांना त्याच व्यक्तीकडे कामांसाठी यावे लागत होते. प्रत्येक कामांचा दर फलक ठरला होता. बदलीचे एव्हढे, नोकरीचे तेव्हढे, फलाना कामांचे एव्हढे आणि तेव्हढे.. असे खुद्द तुमचा पीए सांगत असायचा. मग तुम्ही लोकप्रतिनिधी होते की एजंट होते, हेच समजायला मार्ग नव्हता.*

*तुमचं राजकारण हे सामाजिक नसून व्यावसायिक होत, पैसा हा तुमच्या राजकारणाचा केंद्र बिंदू होता, हे येथील मतदार ओळखून होते व यावेळी त्याची प्रचिती तुम्हाला मिळाली असती पण तुम्ही अजिंक्य राहावे, हीच कदाचित नियती होती.*

*एखादा लोकनेता गेला की गावचे-गाव उठून लोक येतात. रस्त्यांवर पाय ठेवायची जागा नसते. आमचा नेता गेला म्हणून जनता धाय मोकलून रडते. महिला, शेतकरी, शेतमजूर, गरीब सारे दुःखी होवून येतात. पण तसे काही चित्र नव्हते. राजकीय क्षेत्रातील लोकांशिवाय सामान्य नागरीक नव्हते.* *आदल्या दिवशी तर, गेला-आहे, हीच चर्चा जास्त होती. बरे झालं गेला, म्हणणारे बरेच होते. आणि हीच तुमची कमाई होती. तुमचं जाण हे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी एक सबक आहे, की तुम्हाला जनतेची कामे करावीच लागेल, पैसा-पैसा कराल, कार्यकर्त्यांचा निरोध समजून वापर कराल, समाजाला गृहीत धराल तर जनतेची हाय लागल्या शिवाय राहणार नाही. जाताना कुणीच पैसा, बंगला घेवून जात नाही, घेवून जाईल तर फक्त आणि फक्त चांगले नाव…!*

*तुमच्या बद्दल सांगायला अनेक मुद्दे आहेत, मात्र समजदाराला इशारा काफी असतो. आता खोलात जाण्यात अर्थ नाही.*

*जनतेनी लक्षात घ्यावे, अजूनही वेळ गेली नाही, व्यक्तिपूजा टाळा विचारपूजा करा, तरच समाजात चांगले बदल होईल, अन्यथा गुलाम व भक्त बनून राहाल तर पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही.*

*खबरकट्टा – चंद्रपूर -यवतमाळ जिल्ह्यातील अग्रगण्य न्यूज वेबसाईट*