गोमूत्र, गंगाजल शिंपडणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा

44

*चंद्रपुर :-काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन*

*चंद्रपूर : समाजातील स्पृश-अस्पृश, जातीभेद निर्मूलनासाठी थोर महापुरुषांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. मात्र, राज्यात मागील काही दिवसांत एक विशिष्ट विचारसरणी समोर येत आहे. यातून समाजात पुन्हा जातीभेद, स्पृश्य-अस्पृश्य दाखविण्याचे प्रकार घडू लागले आहेत. असाच प्रकार १७ एप्रिलला नागपुरात पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर घडला. या सभास्थळी गोमूत्र, गंगाजल शिंपडण्याचा प्रकार अशा जनसमुदायाकडून झालेला आहे.*
*हा सर्व प्रकार संतापजनक असल्याने गोमूत्र, गंगाजल शिंपडणाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.*
*काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन यासंबंधीचे निवेदन सादर केले. नागपूर येथील के. डी. के. मैदान नंदनवन येथे १७ एप्रिलला महाविकास आघाडीची सार्वजनिक सभा पार पडली. यासाठी न्यायालयाने रितसर परवानगी दिली होती. त्यानंतरही काही अज्ञात लोकांनी सभास्थळी जावून गोमूत्र व गंगाजल शिंपडले. सभेमुळे अपवित्र झालेले मैदान पवित्र केल्याचे दर्शवित बहुजन जनतेचा अपमान केला. तसेच लोकांमध्ये स्पृश्य-अस्पृश्य अशी भावना निर्माण केली. जातीयवाद निर्माण करून असंतोष पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे कृत्य करणाऱ्या व्यक्तींविरुध्द, त्यांच्या हितचिंतकांविरुद्ध कारवाई करण्याची तक्रार यावेळी करण्यात आली.*
*काही अज्ञात समाजकंटकानी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीना बोलावून गोमूत्र, गंगाजल शिंपडण्याचे चित्रीकरण केले. तसेच या कृतीचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारितसुद्धा केले. यातून या समाजकंटकाचा सभेत उपस्थित विविध जाती, धर्म व पंथाच्या लोकांना तुच्छ लेखण्याचा हेतू असल्याचे दिसून येते. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला अधिकार दिला आहे. परंतु, या समाजकंटकांकडून नागरिकांच्या अधिकारावर गदा आणत संविधानाची अवहेलना करण्यात आली आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करणे, अंधश्रद्धा पसरविणे, यासह अन्य गंभीर गुन्हे तातडीने दाखल करण्याची मागणी करण्यात आली.*
*निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात तेली समाजाचे शहराध्यक्ष गोपाल अमृतकर, माजी महापौर संगीता अमृतकर, अनुसूचित जाती विभागाचे कुणाल रामटेके, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष रतन शीलावार, माळी समाज युवा मंचचे कुणाल चहारे, समता समाज संघाचे नरेंद्र डोंगरे, काँग्रेसच्या सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे, लहुजी उत्साद ब्रिगेडचे सोनू डोंगरे यांच्यासह अनेकांचा सहभाग होता.*