वन्य प्राण्यांनी केलेल्या शेतपिकाच्या नुकसान भरपाईत भरीव वाढ

59


*वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश*

*गडचिरोली जिल्हा काँग्रेस शिष्टमंडळाच्या प्रयत्नांना यश*

अतिदुर्गम,आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात एकिकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध नसताना येथील नागरीकांची पुर्णता मदार शेती व्यवसायावर अवलंबून आहे.असे असताना मागील दोन वर्षांपासून जिल्ह्याच्या जंगलव्याप्त परिसरात वन्य प्राण्यांनी उत्पात मांडुन अनेकांचे जीव घेतले आहेत.तसेच शेत पिकाची,घरांची प्रचंड नुकसान केली आहे.शासकीय स्तरावरुन संबंधितांना नुकसान भरपाई देण्यात येत असली तरी ती तुटपुंजी व अत्यल्प असुन आठ महिण्यानंतरही संबंधितांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याबाबत गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुद्दा उपस्थित केला असता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या गंभीर बाबीची तत्काळ दखल घेत वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना वन्य प्राण्यांनी केलेल्या शेत पिकाच्या नुकसान भरपाईत भरीव वाढ करण्याचे निर्देश देऊन कर्तव्यात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत.
सेमिनरी हिल्स नागपूर येथील वनविभागाच्या हरी सिंह सभागृहात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची आढावा बैठक घेतली,दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.आयोजित आढावा बैठकीला स्थानिक आमदार देवराव होळी,आमदार कृष्णा गजबे,सुभाष धोटे यांच्यासह प्रधान सचिव (वने)बी.वेणू गोपाल रेड्डी,प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख शैलेंद्र टेंभुर्णिकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)महिप गुप्ता,नागपूर मुख्य वनसंरक्षक लक्ष्मी,गडचिरोली मुख्य वनसंरक्षक एस.रमेश कुमार,वडसा वन विभागाचे उप वनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल आदी वन विभागाचे अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदेश महासचिव डाॅ.नामदेव किरसान,मनोहर पोरेटी, विश्वजित कोवॉसे,छगन शेदमके आरमोरी काँग्रेस कमिटी अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, तेजस मडावी, माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, पिंकु बावणे मोहित अत्रे स ह कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील दोन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात वाघांच्या हल्ल्यात तब्बल २५ ते ३० लोकांचा मृत्यु झाला आहे.घटनेत मृत्यु पावलेल्या व्यक्तिच्या कुटुंबियांना देय नुकसान भरपाईत वाढ करण्यात आली असली तरी कुटुंबाची होत असलेली अपरिमित हानी भरून निघणे शक्य नसल्याने कुटुंबावर ओढवलेले एकुणच संकट पाहु जाता मयताच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यात यावे,जंगली हत्तींनी केलेल्या नुकसानीची भरपाई १५ हजार रुपये देण्यात येते त्यात वाढ करण्यात यावी, गोडाऊन मधील धान्याची केलेली नुकसान ग्राह्य धरल्या जात नाही ती ग्राह्य धरल्या जावी,जिल्ह्याच्या अनेक गावांत नेटवर्क नसल्याने ऑनलाईन अर्ज करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागते करीता ऑनलाईनची अट रद्द करून ऑफलाईन अर्जाकरीता सोय उपलब्ध करून देण्यात यावी तसेच वन्यप्राणी व मानवी संघर्षात अधिक लोकांचा जीव जाणार नाही करीता ठोस उपाययोजना अंमलात आणण्याची मागणी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडेंसह पदाधिकारी नी केली होती.
दरम्यान चर्चेला उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जंगली हत्तींनी केलेल्या शेतपिकाच्या नुकसान भरपाईत ५० हजार रुपयांपर्यंतची वाढ करण्यात यावी,शेतशिवार परिसरात चैनलिंग फॅन्सिंगची व्यवस्था करून वाघांचे तसेच जंगली हत्तींचे यथायोग्य लोकेशन मिळवून नागरीकांना सतर्क ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, जंगली हत्तींनी घराची नुकसान केल्यास देय असलेल्या नुकसान भरपाईत वाढ करण्यात यावी तसेच जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करता येतील काय?याबाबत अभ्यासपूर्वक अहवाल सादर करण्यासोबतच देय नुकसान भरपाई ३० दिवसाच्या आत देण्याचा कायदा केला असताना आठ महिन्यांपासून नुकसानग्रस्तांना वंचित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे
निर्देशही वनमंत्री मुनगंटीवार यांनी संबंधित वनाधिकाऱ्यांना दिले आहेत.वनमंत्र्यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून केलेल्या मागण्यांना न्याय दिल्याबद्दल गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी सुधीरजी मुनगंटीवार यांचे आभार मानले.