चंद्रपूर येथील ऑटो चालक-मालक बांधवांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर
– आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार
स्व. चांगुनाबाई मुनगंटीवार यांच्या नावाने म्हाडा वसाहतीत फलक अनावरण
आ.मुनगंटीवार यांनी करमाफी, घरे व सुविधा ऑटो चालकांसाठी विधानसभेतील लढ्याचा केला उल्लेख
दाताळा परिसरात मॉडेल शाळा व अत्याधुनिक सुविधांसह सर्वांगीण विकासाचा आराखडा
चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील दाताळा येथील स्व. चांगुनाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार म्हाडा वसाहतीतील फलकाचे अनावरण आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भावनिक वातावरणात पार पडले. आईच्या स्मृतींना वंदन करताना त्यांनी आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या संस्कारांची आठवण करून दिली, तर दुसरीकडे चंद्रपूर येथील ऑटो चालक-मालक बांधवांच्या हक्कांसाठी नेहमीप्रमाणे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत या वसाहतीसह संपूर्ण चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅपही स्पष्ट केला.

कार्यक्रमाला आशीर्वाद ऑटो चालक-मालक गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष बंडू आवारी, ऑटो चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत, उपाध्यक्ष विनोद चन्ने, कोषाध्यक्ष किशोर वाटेकर, जिल्हा सचिव सुनील धंदरे, सरपंच विक्की लाडसे, अनिल डोंगरे तसेच संघटनेचे सदस्य जाकीर शेख, जहीर शेख, महेश ढेकरे, विश्वेश्वर राऊत, जनार्दन गुंजेकर, रवि आंबटकर, शंकर थोरात, अरविंद उमरे, विलास बावणे, अंकुश कौराते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले की, ऑटो चालक-मालक संघटनेने प्रश्न सोडवण्यासाठी हाक दिली तेव्हा आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. विधानसभेत प्रभावी आवाज उठवत ऑटो चालकांवरील व्यवसाय कर (प्रोफेशनल टॅक्स) रद्द करण्यात यश मिळवले तसेच २०१२ मध्ये वाहनकरही मागे घेण्यास सरकारला भाग पाडले. शहरात विविध ठिकाणी ऑटो रिक्षा स्टॅण्ड उभारण्यात आले असून विशेष बाब म्हणून म्हाडामार्फत अल्प दरात १०० घरे उपलब्ध करून देण्यात आली, असे आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.

म्हाडा वसाहतीच्या विकासाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, येत्या दीड वर्षात येथे एक उत्कृष्ट मॉडेल शाळा उभारण्यात येणार असून ऑटो चालक व वसाहतीतील कुटुंबातील विद्यार्थ्यांना कोणतीही फी न देता दर्जेदार शिक्षण मिळेल. म्हाडा अंतर्गत १० हजार घरांच्या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात २,००४ घरांना मंजुरी मिळाली असून यासाठी २३५ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच म्हाडा येथील रस्ते प्रकल्पासाठी १४७ कोटी रुपये मंजूर करण्यासाठी राज्यसरकार आणि मुख्यमंत्री आणि विधानसभेत आवाज बुलंद करत हा निधी मंजूर करून घेतला याचा मनापासून आ.मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त केला. या परिसरात स्ट्रीट लाईट, सिमेंट रस्ते, पिण्याचे पाणी, ड्रेनेज, गार्डन, जिम यांसारख्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
तसेच, वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने १३७ कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टेडियम उभारण्यात येत असून नवीन चंद्रपूर शहरासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीद्वारे उत्कृष्ट आराखडा तयार करण्यात येणार आहे. कोसारा येथे ५.५० कोटी रुपयांच्या खर्चातून ई-लायब्ररी, ऑक्सिजन पार्क आणि वृद्धाश्रम उभारण्यात येणार असून या सर्व प्रकल्पांद्वारे टप्प्याटप्प्याने संपूर्ण विभागाचा सर्वांगीण विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ऑटो चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले असून त्याला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या जून महिन्यातील विधानसभेत पुन्हा मुद्दा उपस्थित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्व. चांगुनाबाई मुनगंटीवार यांच्या नावाने फलकाचे अनावरण करताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की, “आईचे नाव ही केवळ ओळख नसते, तर ती आयुष्यभर साथ देणारी शक्ती, संस्कारांची शिदोरी आणि प्रत्येक पावलावर प्रेरणा देणारी सावली असते असे त्यांनी यावेळी नमूद करत आपल्या भावना व्यक्त केल्या.”कार्यक्रमाच्या शेवटी आशीर्वाद ऑटो चालक-मालक गृहनिर्माण सहकारी संस्थेकडून आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.





