आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत नवीन चंद्रपूरच्या नियोजनबद्ध व सर्वांगीण विकासाचा प्रश्न ठामपणे उपस्थित केला.
१९९८ मध्ये विशेष नियोजन प्राधिकरण स्थापन होऊनही प्रकल्पाला अपेक्षित गती मिळाली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. नवीन चंद्रपूरच्या वाढत्या गरजा लक्षात घेता रुंद रस्ते, वीज-पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन व उद्याने यांसारख्या मूलभूत सुविधा उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच प्राधिकरणाला अधिक अधिकार देणे, लिलावातून मिळालेला निधी स्थानिक विकासासाठी वापरणे आणि वीज, पाणी, ड्रेनेज तसेच रस्त्यांसाठी मागितलेल्या १४५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्याची आणि चंद्रपूरसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची मागणी केली. यासोबत नवीन चंद्रपूरच्या विकासासाठी मुंबईत बैठक घेण्याचे नमूद केले.

या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आ. मुनगंटीवार यांनी मांडलेले मुद्दे योग्य असल्याचे सांगत सकारात्मक प्रतिसाद देत. नवीन चंद्रपूरसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्त केला जाईल, आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच १४५ कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला वित्त विभागाकडून मंजुरी मिळवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. अधिवेशन संपण्यापूर्वी मुंबईत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नवीन चंद्रपूरच्या विकासाला गती देण्यात येईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.





