“ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला…”
राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र विधानसभेत अशासकीय ठराव मांडत महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ मरणोत्तर प्रदान करण्यात यावा, अशी मागणी केली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान अतुलनीय असून अंदमानच्या सेल्युलर कारागृहात त्यांनी सहन केलेल्या कठोर यातना, तसेच राष्ट्रभक्तीचा जागर केलेले त्यांचे विचार आणि साहित्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले. त्यामुळे त्यांना भारतरत्न देण्याची आग्रही मागणी आमदार मुनगंटीवार यांनी सभागृहात व्यक्त केली.

या चर्चेला उत्तर देताना राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा देशाला अभिमान आहे. त्यांच्या सन्मानार्थ ‘भारतरत्न’ देण्याबाबतचा शासकीय ठराव राज्य शासनाच्या वतीने मांडून तो केंद्र शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.





