बल्लारपूरमध्ये सागवानाच्या जागतिक वारशाला नवे व्यासपीठ!
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे जागतिक दर्जाचे टिम्बर म्युझियम-झायलेरियम उभारण्याच्या राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला यश मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली आहे. विधानसभेतील अर्धा तास चर्चेत आ. मुनगंटीवार यांनी हा विषय प्रभावीपणे मांडत सातत्याने पाठपुरावा केला होता. वनमंत्री गणेश नाईक यांनीही सभागृहात सकारात्मक भूमिका घेत टिम्बर म्युझियम उभारण्याचे आश्वासन दिले होते. या संसदीय आयुधांच्या प्रभावी वापराचे हे मोठे यश मानले जात आहे.

विधानसभेत बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकडाच्या समृद्ध ऐतिहासिक वारशावर प्रकाश टाकला.अयोध्येतील श्रीराम मंदिर, नवी दिल्लीतील संसद भवन, भारत मंडप आदी राष्ट्रीय वास्तूंमध्ये चंद्रपूरच्या सागवानाचा वापर झाल्याचे त्यांनी नमूद केले. सुमारे १५० कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे बल्लारपूर येथे उभारले जाणारे टिम्बर म्युझियम-झायलेरियम हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरण्यासोबतच वनसंपदा व लाकूडशास्त्राच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे संशोधन केंद्र ठरणार आहे.




