साहित्य क्षेत्रातील ताऱ्याचा अस्त : सुनील पाल
साहित्यिक कवी आरिफ काजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
हिंगणघाट
मानवी संवेदनशीलतेची सृजनशील अभिव्यक्ती जर कोणत्या माध्यमातून प्रभावीपणे व्यक्त होत असेल, तर ते म्हणजे साहित्य क्षेत्रातील काव्यप्रकार होय. आपल्या वाणी आणि लेखणीच्या जोरावर साहित्य क्षेत्रात देशभरात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे हिंगणघाटचे सुप्रसिद्ध कवी आरिफ काजी यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रातील एका तेजस्वी ताऱ्याचा अस्त झाला असून ही साहित्यविश्वासाठी मोठी हानी आहे, असे प्रतिपादन लाफ्टर चॅलेंज विजेते सुप्रसिद्ध हास्य अभिनेते सुनील पाल यांनी केले.
३ मार्च रोजी साहित्यरत्न मंच यांच्या वतीने जी.बी.एम.एम. शाळेच्या सभागृहात आयोजित श्रद्धांजली सभेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. शांतीलाल कोचर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक इमरान राही, अॅड. अमानी कुरेशी, प्रा. मजीद बेग मुगल, अॅड. उल्हास वाघ, अॅड. इब्राहीम बख्श आजाद, कवी मुरली लाहोटी, डॉ. रविपाल भालशंकर, अब्दुल कदीर बख्श, कविता बैस, मोहम्मद मकसूद बावा, सज्जाद बोहरा, चंगेझ खान, मडावी सर, गोपाल सागर व्यास आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
“एक मित्र गमावल्याने जग संपत नाही, असे सर्वजण म्हणतात; परंतु हजारो मित्र असले तरी त्या एका मित्राची उणीव कधीही भरून निघू शकत नाही,” असे सांगत कवी आरिफ काजी यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत इमरान राही यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या प्रसंगी अॅड. अमानी कुरेशी, प्रा. मजीद बेग मुगल, अब्दुल कदीर बख्श, कविता बैस, कवी मुरली लाहोटी, डॉ. शांतीलाल कोचर, सोनल तिवारी, आम्रपाली पार्वे आदी मान्यवरांनीही आपल्या भावना व्यक्त करून कवी आरिफ काजी यांना श्रद्धासुमने अर्पण केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. इब्राहीम बख्श आजाद यांनी केले.




