राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळाच्या सभागृहात मांडण्यात येणाऱ्या लक्षवेधी सूचनांवरील प्रश्नांची उत्तरे नियोजित कालमर्यादेत मिळाली पाहिजेत, याबाबत आज विधानसभेत ठामपणे प्रश्न उपस्थित केला.

लोकप्रतिनिधींमार्फत मांडले जाणारे प्रश्न हे थेट जनतेच्या समस्या, अपेक्षा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीशी संबंधित असतात, असे सांगताना आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, अशा प्रश्नांवर वेळेत आणि समाधानकारक उत्तरे मिळणे ही लोकशाही प्रक्रियेची मूलभूत गरज आहे. उत्तरांमध्ये होणारा विलंब हा केवळ प्रक्रियात्मक अडथळा नसून, तो जनतेच्या हक्कांवर परिणाम करणारा गंभीर मुद्दा आहे. यासाठी संबंधित विभागांनी जबाबदारीने आणि काटेकोरपणे काम करून निश्चित कालमर्यादेत उत्तरे सादर करावीत, तसेच उत्तरांची गुणवत्ता आणि पारदर्शकता सुनिश्चित करावी, अशी ठाम मागणी त्यांनी सभागृहात केली.





