Google search engine
Home Breaking News मुल येथे सुरू करावे पॉलिटेक्निक कॉलेज!

मुल येथे सुरू करावे पॉलिटेक्निक कॉलेज!

77

*ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे मागणी*

*अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा*

*चंद्रपूर, दि.28 – मुल तालुक्यात खाणकाम व्यवसायावर आधारित उद्योग व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.*

यासंदर्भात बुधवारी (ता. २७) मुंबई येथे मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण सहसचिव संतोष खोरगडे यांच्यासोबत बैठक घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच उच्च व तंत्रशिक्षण प्रधान सचिव यांच्याशी ना. श्री. मुनगंटीवार यांनी फोनवर सकारात्मक चर्चा केली.

चंद्रपूर जिल्हात ठिकठिकाणी खाणीचे उत्खनन सुरू असल्याने या जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख प्राप्त आहे. मुल तालुक्यामध्ये खाणकाम व्यवसाय व त्यावर आधारित उद्योग सुरू होत आहेत. त्यामुळे या उद्योगांना कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली आहे. परंतू या ठिकाणी उच्च तांत्रिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उद्योगांना स्थानिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. उच्च व तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील युवकांना इतर शहरांमध्ये जावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी गैरसोय होत आहे. परिणामी स्थानिक विकासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उद्योगासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता तसेच स्थानिक युवकांना तांत्रिक शिक्षण मिळून रोजगार उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने मुल येथे एक शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना केली आहे.

यासंदर्भात ना.श्री. मुनगंटीवार यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेला चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. तसेच प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच मुल येथील पॉलिटेक्निक कॉलेजचा मार्ग मोकळा होणार आहे.

*धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या – ना. श्री. सुधीर मुनगंटीवार*

*ना. मुनगंटीवार यांचे कृषी विभाग प्रधान सचिव तसेच मदत व पुनर्वसन सहसचिवांना निर्देश*

*शेतकऱ्यांप्रती ना. सुधीर मुनगंटीवार यांची संवेदनशीलता*

*चंद्रपूर, दि. 28 : चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने काढणीच्या वेळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने, पुढे सर्वेक्षण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी विभाग प्रधान सचिव जयश्री भोज तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांच्या सोबत बैठक घेत याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेशही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिले.*

जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी लष्करी अळी तसेच इतर किडींच्या प्रादुर्भावामुळे हवालदिल झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता असून सदर नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांची निकड लक्षात घेता तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देखील ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालय येथे बैठकीत संबधित अधिकारी यांना दिले.

*प्रचाराच्या रणधुमाळीतही पाठपुरावा*
नुकतीच विधानसभा निवडणूक आटोपली. ना. सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूर विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार होते. प्रचार, जाहिरसभा, प्रत्यक्ष भेटीमध्ये व्यस्त असतानाही त्यांनी प्रधान सचिव यांना पत्र लिहून नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अवगत केली होती. आता या संदर्भात आढावा घेत ताबडतोब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात निर्देश दिले.

*शेतकऱ्यांप्रती संवेदनशील*
ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची विक्रमी 202 कोटीची रक्कम मिळू शकली. शेतकऱ्याच्या धानाला 20 हजार रुपये हेक्टरी बोनस देऊन भात उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. सदैव शेतकऱ्यांप्रती ना. मुनगंटीवार संवेदनशील असतात, हे विशेष.