मालधक्क्याविरोधात मुलवासीयांचा आक्रोश मोर्चा

114

*हजारोंच्या संख्येने विद्यार्थी व नागरिकांचा आंदोलनात सहभाग*
संवाददाता

*मुल:-* गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्पातील कच्चे लोहखनिज मुल येथील रेल्वे स्थानकात डम्पिंग करून देशात इतरत्र पाठवण्याकरता मुल रेल्वे स्थानकाची निवड केलेली आहे. या मालधक्क्यामुळे मुल शहराची व आजूबाजूच्या परिसराची प्रदूषणामुळे वाट लागणार आहे. दररोज शेकडो ट्रक शहरातून ये-जा करणार त्यामुळे प्रदूषणासोबतच अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार. हा धोका लक्षात घेऊन मुल बचाव संघर्ष समितीने या मालधक्क्याचा तीव्र विरोध करण्यासाठी गांधी चौकापासून तर मूल तहसील कार्यालयापर्यंत तीव्र आक्रोश मोर्चा काढला.
मुल हे शहर निसर्गाने नटलेल सुंदर शहर आहे. या शहरात रेल्वे स्थानकाला लागूनच खेळाचे एक मोठे मैदान आहे. तसेच कर्मवीर महाविद्यालय, लहान मुलांची शाळा, इको पार्क गार्डन, जिल्हा ग्रामीण रुग्णालय, बुद्ध टेकडी, शिवटेकडी व नागरिकांची वस्ती आहे. मैदानाला लागूनच रेल्वेचा गेट आहे. कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणात दररोज शेकडो नागरिक व्यायाम, योगासने, धावणे, फिरायला जाणे नित्यनियमाने करीत असतात. या मैदानात शाळकरी मुले, युवक दररोज विविध प्रकारच्या खेळांचा सराव करीत असतात. जर हा मालधक्का मुल रेल्वे स्थानकात तयार झाला तर याचे दुरगामी गंभीर परिणाम मूलवासीयांवर होणार आहे. दररोज शेकडो ट्रकांमधून कच्चे लोहखनिज आणल्या गेले तर हवेत विषारी वायू मिसळतील. ट्रकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ अपघातांचे प्रमाण वाढेल. सुंदर शहराचे विद्रुपरीकरण होणार व आरोग्याच्या गंभीर समस्यांना घेऊन येथील नागरिकांना सामोरे जावे लागेल. मालधक्क्यामुळे होणारी हानी ही गंभीर स्वरूपाची असून या विरोधात गुड मॉर्निंग ग्रुप, व्यापारी संघटना, विविध राजकीय व सामाजिक संघटना याचा प्रखर विरोध करताना दिसत आहे. अनेक संघटनांनी प्रशासनाला व लोकप्रतिनिधीला याबाबत निवेदनही दिले आहेत. तरीसुद्धा वरिष्ठ स्तरावरून मालधक्का होणारच असे सांगितले जात आहे. याचा तीव्र विरोध म्हणून आज शाळकरी विद्यार्थ्यांनी व मूल बचाव संघर्ष समितीने या मालधक्याचा विरोध करण्यासाठी तीव्र आक्रोश आंदोलन केले. गांधी चौक पासून मालधक्क्या विरोधात तीव्र निदर्शने करत तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा आणला गेला. या मोर्चात विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुल बचाव संघर्ष समितीने आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन दिले व तात्काळ मालधक्क्याचे काम बंद पाडण्याचे आव्हान केले. जर मालक्याचे बांधकाम बंद केले नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मुल बचाव संघर्ष समितीने प्रशासनाला दिला आहे.